प्राथमिक : शालेय / सहशालेय उपक्रम



मोफत पाठ्यपुस्तक वितरण व स्वागत समारंभ

दरवर्षी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी शाळा सजवली जाते. इ.१ली ते ५वी च्या मुलांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाते. पाठ्यपुस्तक वितरण समारंभ आयोजित केला जातो. यासाठी संस्थेचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहतात. त्यांचे हस्ते पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. तसेच माध्याह्न भोजनात वि‌द्यार्थ्यांना गोड खाऊ दिला जातो.

बालसभा

शाळेच्या परंपरेनुसार इ.३ री व ४ थी ची बालसभा दरवर्षी आयोजित केली जाते. २ ऑक्टोबर, म.गांधीजींची पुण्यतिथी व लालबहादूर शास्त्रीजींची जयंती या निमित्त ३ री ची बालसभा आयोजित केली जाते व १ ऑगस्ट लो.टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त इ.४ थीची बालसभा घेतली जाते. यात जवळजवळ ५० ते ५५ विद्यार्थी सह‌भाग घेतात. या सभांचे वैशिष्ट्य म्हणजे या सभेचे सर्व कामकाज विद्यार्थी स्वतः करतात. यामुळे वि‌द्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांस भरपूर वाव मिळतो.

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेळोवळी स्वच्छता अभियान शाळेत तसेच शालेय परिसरात राबवले जाते. स्वच्छ भारत व सुंदर भारत अभियानार्गत पंढरपूर नगरपालिकेकडून स्वच्छ शाळा पुरस्कार वि‌द्यालयास मिळाला आहे.

सामुदायिक वाढदिवस समारंभ

आपला वाढदिवस शाळेतही साजरा होतो याचा आनंद मुलांना मिळावा तसेच त्यानिमित्ताने मत भगिनींनी शाळेत येऊन मुलांच्या प्रगतीविषयी जाणून घ्यावे आणि सुसंवाद साधावा या उद्देशाने आमच्या मोठ्या बाईंनी हा सामुदायिक वाढदिवस समारंभ शाळेत सुरु केला. ही परंपरा आजतागायत वि‌द्यालयात सुरु आहे आणि ती सुरु राहणारच आहे.

विविध सभांचे आयोजन (उदा.पालकसभा, माता-पालक सभा, शिक्षक-पालकसभा, व्यवस्थापन समिती सभा)

विद्यालयात वेळोवेळी विविध सभांचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या व विद्यालयाच्या प्रगतीबाबत, शासनाने सांगितलेल्या विविध योजना संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जालात.

हळदीकुंकू समारंभ

माता पालकांसाठी श्रावणी शुक्रवार, मातृदिन अशा निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या निमित्ताने वेगवेगळे तज्ज्ञ बोलावून मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, इ. विषयांवर मार्गदर्शन दिले जाते.

शैक्षणिक सहल

सहशालेय उपक्रम म्हणून दरवर्षी वि‌द्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. मुलांना ऐतिहासिक गोष्टींची माहिती व्हावी, त्यांसंबंधी प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, तसेच मित्रांबरोबर प्रवासाचा अनुभव घेता यावा, स्वावलंबन यासाठी दरवर्षी इ.४ थी साठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. या सहलीचे सुयोग्य नियोजन करून ती यशस्वीपणे पूर्ण केली जाते.

क्षेत्रभेट

दरवर्षी वि‌द्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. यामध्ये पोस्ट ऑफिस, बँका, भाजी मंडई, कुंभार काम, शिंपी दुकान, मंदिरे, रोप वाटिका अशा वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित करून वि‌द्यार्थ्यांना तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.

क्रीडा स्पर्धा

वि‌द्यालयात वेळोवेळी शालेय व क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये तीन पायाची शर्यत, लंगडी, कबड्डी, खो-खो, धावणे, दोरीवरील उड्या, लिंबू चमचा, अडथळयाची शर्यत इ. स्पर्धा घेतल्या जातात.

याशिवाय न. पा. शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतही वि‌द्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यात वि‌द्यालयाने संचलन, लंगडी, कबड्डी अशा सांघिक व लिंबू चमचा, धावणे अशा वैयक्तिक स्पर्धामध्ये यश मिळवले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम

दरवर्षी वि‌द्यालयात वि‌द्यार्थ्यांचे विविध सण, स्नेहसं‌मेलन या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गणेशोत्सवामध्ये प्रत्येक इयत्तेचे वेगवेगळे कार्यक्रम होतात. यामध्ये सामुहिक व वैयक्तिक कार्यक्रम साजरे करतात, यामध्ये नृत्य, नाटक, तबला वादन, वैयक्तिक नृत्य यांचे सादरीकरण होते.

न.पा. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतही वि‌द्यालयाने दरवर्षी खाजगी शाळांतून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.

स्नेहसंमेलन

दरवर्षी वि‌द्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक पारितोषिक समारंभ घेतला जातो. यात जवळजवळ २,०००/- रुपयांची बक्षीसे दिली जातात.

यामध्ये शिक्षक-पालकांनी ठेवलेली बक्षिसे तसेच काही दानशूर लोकांनी संस्थेच्या नावे ठेवी ठेवल्या असून त्याच्या व्याजातून बक्षीस वितरण केले जाते. तसेच काही व्यक्तींनी गरजू व होतकरू मुलांसाठीही विशेष ठेव ठेवली आहे. त्याच्या व्याजातून गरजू, होतकरू वि‌द्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या रुपात बक्षीस दिले जाते. जवळजवळ ३०० ते ३५० मुले दरवर्षी बक्षीसासाठी पात्र असतात. हा आकडा वाढतच चालला आहे.

स्नेह‌संमेलात सांस्कृतिक कार्यक्रमही असतात. इ.१ली ते ४थीच्या १६ वर्गाचे स्वतंत्र कार्यक्रम साजरे होतात. यात विविध प्रकारचे नृत्य, ऐतिहासिक नाटके यांचे अप्रतिम सादरीकरण वि‌द्यार्थी करतात. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चार दिवस साजरा केला जातो.

समूहगीत गायन

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन या दिवशी विद्यार्थ्यांचे कवायत संचलनाबरोबर समूहगीत गायन घेतले जाते. इ.३री व ४थी चे ५०० विद्यार्थी तालासुरात समुहगीताचे गायन करतात.

तसेच विविध आंतरशालेय स्पर्धा व शाळेतील कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी समूहगीत सादर करतात. ज्ञानप्रबोधिनी सोलापूर तर्फे घेण्यात आलेल्या समूहगीत गायन स्पर्धेत वि‌द्यालयाने सोलापूर जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस

योगाचे महत्त्व समजण्यासाठी दरवर्षी २१ जून दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. यामध्ये शासनाने दिलेल्या कृतीपत्रिकेनुसार आसने व इतर आसने करून घेतली जातात.

वृक्षदिंडी व साक्षरता दिंडी

आषाढीवारी निमित्त इयत्ता १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी काढली जातेच पण त्याबरोबर झाडांचे महत्त्व समाजातील लोकांना समजावे, वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना लोकांनी करावी यासाठी समाज जागृती व्हावी म्हणून वृक्ष-दिंडी तसेच शिक्षणाची जनजागृती व्हावी म्हणून साक्षरता दिंडीचे आयोजन केले जाते.

ससाहित्य सामूहिक कवायत व संचलन

शाळेत वि‌द्यार्थ्यांना डंबेल्स, निशाण, चेंडू, घुंगरुकाठी इ. ससाहित्य कवायत प्रकार तसेच बैठे कवायत प्रकार, उभे कवायत प्रकार घेतले जातात. त्यासाठी पुरेशा प्रमाणात साहित्य विद्यालयात उपलब्ध आहे. याचबरोबर संचलनही घेतले जाते.

विविध स्पर्धांचे आयोजन

वि‌द्यालयात वेळोवेळी चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर, गीत-गायन, वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये अनेक वि‌द्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात.

सण व उत्सव

विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती रुजवावी तसेच धार्मिक सणांचे महत्त्व कळावे त्याचबरोबर त्या सणामागील धार्मिक व वैज्ञानिक कारण लक्षात यावे यासाठी सण व उत्सव साजरे केले जातात.

संविधान दिन

दरवर्षी २६ नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा करतात. उद्देशिकेचे सामूहिक वाचन व पठण केले जाते. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

बालदिन / वाचन प्रेरणा दिन

दरवर्षी १५ ऑक्टोबर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करतात. या दिवशी पुस्तक प्रदर्शन व पुस्तकांचे गटागटाने वाचन करून घेत‌ले जाते. वाचनाचे महत्त्व वि‌द्यार्थ्यांना समजावून दिले जाते. तसेच १४ नोव्हेंबर पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. यानिमित्त वि‌द्यार्थ्यांसाठी खेळ, हस्तकला, चित्रकला अशा उपक्रमाचे आयोजन कले जाते.

अपूर्व विज्ञान मेळावा

अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामध्ये इ. ४थीच्या वि‌द्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन घेतले जाते. त्यामध्ये परीक्षकांना बोलावून नंबर काढले जातात. त्यांना बक्षीस देऊन कौतूक केले जाते.

हात धुणे दिन

१५ ऑक्टोबर या दिवशी हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी जागतिक हात धुणे दिन साजरा करतात. या दिवशी हात कशा पदधतीने धुवावेत याचे विविध प्रकार प्रात्यक्षिकाने दाखवले जातात.

राष्ट्रीय जंतनाशक दिन

दरवर्षी १० ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय जं‌तनाशक दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वि‌द्यार्थ्यांना (जंतनाशक) गोळ्यांचे वाटप केले जाते.

मतदार दिवस

समाजात मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी २५ जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वि‌द्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली जाते. यावेळी विद्यार्थी घोष‌वाक्ये व घोषणांच्या माध्यमाद्वारे जनजागृती करतात.

शिक्षकदिन

५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म‌दिनानिमित्त शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. या दिवशी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांची भाषणे घेतली जातात, तसेच संस्थेतर्फे सर्व शिक्षकांचा सन्मान केला जातो.

विद्यार्थीदिन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत प्रवेश केलेला दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर हा दिवस. हा दिवस शाळेत वि‌द्यार्थीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वि‌द्याथ्यांची भाषणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या जातात.

थोर नेत्यांच्या जयंती व पुष्यतिथी

विद्यालयात दरवर्षी राजर्षी शाहू महाराज, म.ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले (बालिका दिन), छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अशा अनेक थोर नेत्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावे म्हणून त्यांची माहिती सांगितली. त्यानिमित्ताने वि‌द्यार्थ्यांची भाषणे होतात आणि विविध स्पर्धा घेतल्या जातात.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन

वि‌द्यालयात वरील राष्ट्रीय सण मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत, व समूहगीतांचे तालासुरात गायन होते. ससाहित्य कवायत, नृत्य, संचलन, लेझीम, मनोरे इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

कै.कुसुमताई आराध्ये स्मृतिदिन

संस्थेच्या संस्थापिका कै.कुसुमताई आराध्ये यांचा स्मृतिदिन दरवर्षी २२ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. यानिमित्ताने पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन कैले जाते.

हस्तलिखित

४थीच्या विद्यार्थ्यांचे हस्तलिखित तयार केले जाते. यामध्ये वि‌द्यार्थ्यांच्या स्वरचित कविता, निबंध, स्वत: काढलेली चित्रे, त्यांनी संग्रहित केलेली विविध माहिती इ. त्यांच्याच हस्ताक्षरात लिहून पुस्तक तयार केले जाते. त्याचे निरोप समारंभादिवशी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन केले जाते.

वर्ग सुशोभन

वि‌द्यालयात १ली ते ४थी चे १६ वर्ग आहेत. सर्व वर्ग हवेशीर व प्रशस्त आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व वर्ग सुंदर व आकर्षक सजवलेले जातात. वर्गात आकर्षक पताका, तक्ते, तरंगचित्रे इ.शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने सुंदर सजवले जातात. यातील बहुतांशी साहित्य शिक्षक स्वतः सुंदर हस्ताक्षरात तयार करतात.

निरोप समारंभ

दरवर्षी इ.४थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा केला जातो. वि‌द्यार्थ्यांना खाऊ दिला जातो. कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात वि‌द्यार्थी पालक आपले मनोगत व्यक्त करतात.