संस्थापिका : कै.कुसुमताई रामचंद्र आराध्ये


           परम पूज्य साने गुरुजींच्या ‘बालसेवा हीच ईश्वरसेवा’ या वचनाप्रमाणे चंदनासम झिजणार्‍या शिशु विहार आणि आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या संस्थापिका कै.कुसुमताई आराध्ये. त्यांना लहानपणापासूनच वाचन, चिंतनाची आवड होती. संगीत, साहित्य, कला आणि व्हायोलिन वादनाचा छंद होता. १९५४ साली त्यांनी पूर्व प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले आणि १९५६ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिशु विहार’ ची आणि १९५८ साली ‘आदर्श’ ची स्थापना केली. स्वयंशिस्त, सुसंस्कार, शैक्षणिक गुणवत्तेमुळे लवकरच शाळा नावारुपाला आली. संस्थेचा व्याप सांभाळून संस्थेच्या सर्वांगीण हितासाठी १९६४ मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली व पुढे प्रथम श्रेणीत बी.एड. पूर्ण केले. कुशल नेतृत्व, कल्पकता, गुणग्राहकता, रसिकता, प्रबोधनाची तळमळ, दूरदृष्टी, अभ्यासूवृत्ती, चिकित्सकता, स्पष्टवक्तेपणा, करारीपणा, कामातील चिकाटी, निस्पृहता ही त्यांची अंगभूत गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भेटी दिल्या. कोसबाडच्या शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मादाम माँटेसरीच्या बालशिक्षण पद्धतीचा अवलंब करून त्यांनी शिशुविहारमध्ये बालकांना शैक्षणिक साहित्यामधून हसत-खेळत आनंददायी शिक्षणपद्धतीचा अंगिकार केला. पुढे शाळेच्या व्यापात त्यांना वैयक्तीक जीवनाचाही विसर पडला. या साध्वीने आजन्म केवळ शाळेचाच विचार केला आणि आपले सारे जीवन बालशिक्षणासाठी व्यतीत केले. त्यांना मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.

१) महिला समितीतर्फे पुरस्कार – मानिनी महिला समिती, पंढरपूर.
२) महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, नांदेड
३) पंत अमात्य बालविकास निधी, कोल्हापूर तर्फे बालसेवा पुरस्कार
४) सरदार रास्ते बालक मंदीर, पुणे यांचेतर्फे कै.गिरीजा रास्ते समाजसेवा पुरस्कार
५) ज्ञानप्रबोधिनी, बालविकास मंदीर, सोलापूर विभागीय अधिवेशनात शिक्षणक्षेत्रातील तज्ञ सल्लागार म्हणून सत्कार
६) अर्बन बँक महिला शाखा, पंढरपूर यांचेतर्फे बालसेवा पुरस्कार
७) सांगोला महिला मंडळ यांचेतर्फे सत्कार
८) पंढरपूर फेस्टिव्हल यांचेतर्फे सत्कार
९) वरखेडकर मित्रमंडळ यांचेतर्फे सत्कार
१०) स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेतर्फे शिक्षणतज्ञ म्हणून सत्कार
११) निर्भिड आपलं मत यांचेतर्फे शिक्षणक्षेत्रात वेगळा ठसा उमटविल्याबद्दल सत्कार
१२) वै.सावित्रीबाई उंबरकर यांचे नावे दिला जाणारा सन्मान पुरस्कार
१३) सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय – शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याबद्दल २००८
१४) सहकार गणेशोत्सव मित्रमंडळ यांचेतर्फे सहकार पुरस्कार २०१२
१५) महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार
१६) वै.श्रीसंत तनपुरे बाबा पुण्यतिथी महोत्सव मातृपूजन २०१२